Tuesday, December 8, 2009

प्रेम

     प्रेम ह्या शब्दातच इतका गोडवा आहे ना, कि प्रेमाचा विषय जरी काढला तरी मन प्रफ्फुलीत होते. प्रेमाची व्याख्या करायला गेले तर ती बहुतेक करता सुद्धा येणार नाही. प्रेम हे नगण्य असते. प्रेम हे कोणालाही, केंव्हाही आणि कोणावरही होऊ शकते. तसे पहिले तर प्रेमाचेही विविध प्रकार असतात. आईचे आपल्या बाळावर, गाईचे आपल्या वासरावर, एका बापाचे आपल्या कुटुंबावर, भावाचे बहिणीवर, चित्रकाराचे चित्रावर, लेखकाचे व वाचकाचे पुस्तकावर. आत्ता महत्वाचे राहिले ते एका मुलाचे एका मुलीवरचे प्रेम.
     तसे पाहता आपणा सर्वांनाच एकदातरी प्रेम व्हावे असे वाटत असते. हि गोष्ट काहीजण सांगतात काहीजण सांगत नाहीत. एका मुलाला एखादी सुंदर मुलगी दिसली कि गुदगुल्या व्हायला लागतात, तसेच मुलींनाही एखादा चांगला मुलगा पहिला कि गालातल्या गालात हसू येते. प्रेम होण्याचे मुख्य ठिकाण म्हणजे कॉलेज, तसे आज काल शाळांमध्ये पण प्रेम होते बरका! मुलगा असो कि मुलगी दोघंही एकमेकांचे आकर्षण हे असतेच. सगळ्यात जास्त आकर्षण हे आठवी ते कोलेज चे पहिले, दुसरे वर्ष , यामध्येच जास्त असते. मी आकर्षण हा शब्द मुद्दामच वापरला आहे, कारण या वयात प्रेम ह्या शब्दाचासुद्धा अर्थ माहित नसतो. तुमचे ते वय निघून गेले असेल तर आठवून पहा जरा कधीतरी, कोणीतरी आवडून गेलेच असते आपणाला. आणि तुम्ही त्या वयात असाल तर सध्याला ते अनुभवत सुद्धा असाल.
       असे म्हणतात कि, "प्यार किया नही जाता हो जाता है" म्हणजेच प्रेम हे केले जात नाही तर होते. पण मला एक गोष्ट समजत नाही कि, प्रेम वगैरे होण्यासाठी आधी काहीतरी प्रयत्न, काहीतरी खटाटोप केला पाहिजे की नाही? प्रयत्न म्हणजे फक्त मुलीच्या पाठीमागे लागणे एवढेच नव्हे तर, कमीत कमी आधी मैत्री तर करावी लागेल. मैत्री हि प्रेमाची पहिली पायरी असते असे बहुतेक लोक म्हणतात. नाहीतर सरळ जाऊन "माझे तुझ्यावर प्रेम आहे " असे जर म्हणालात, तर गालावरती चप्पलचा प्रसाद हि मिळू शकतो. मैत्री कधी सहज होते, तर कधी एखादी व्यक्ती आवडली म्हणून तरी करावी लागते. आज काल तर मैत्री हि करायला भेटावेच लागत नाही तर  chatting, orkut वरूनही मैत्री होते. आणि गप्पा गोष्टी चलू होतात. या गप्पा गोष्टींमधूनच प्रेम होते. कधीकधी तर पाहता क्षणीच प्रेम होते. कसे होते देवास ठाऊक. देवाला काय त्या दोघांनाच ठाऊक. पण खरा खेळ तर पुढे चालू होतो.आत्ता प्रेम झाले पुढे काय? पुढे चालू होतात निरंतर गप्पा, गाटीभेटी, लव शव, फिरायला जाणे. आत्ता हे सर्व करायचे म्हटले कि पैसा आणि वेळ दोन्हीही खर्च कराव्या ह्या लागणारच.  
      बरे ते नंतर पाहू, अगोदर याच नाण्याची दूसरी बाजु बघुयात. बऱ्याच वेळा असे आढळून आले हि, खूप मुले किंव्हा मुली याच गोंधळात असतात कि आपण समोरच्या व्यक्तीच्या खरेच प्रेमात पडलोत का नाही. आपणाला खरेच प्रेम झाले आहे का नाही ते त्यांचे त्यांनाच माहित नसते. पण जे काही चालले आहे ते खूप छान आहे आणि हे असेच चालू राहावे असी त्यांची इच्छा असते. पुढे काय करायचे, किंव्हा होईल याची त्यांना काहीच चिंता नसते. हेच सुखाचे दिवस आहेत, ते मजेत घालउया, नंतर चे नंतर पाहू.   
      कधी कधी दोघांपैकी एकालाच प्रेम होते. ते जेंव्हा समोरच्या व्यक्तीला समजते व ती व्यक्ती या गोष्टी साठी नकार देते, तेंव्हातरी पुढे पाऊल कसे टाकायचे ते ठरवले पाहिजे.  ह्या प्रेमाला एकतर्फी प्रेम असेही म्हणू शकत नाही कारण, समोरची व्यक्तीही या कारणाला तितकीच जबाबदार असते व हे सर्व होऊन सुद्धा त्यांचे बोलायचे, भेटायचे थांबत नाही, याला आपण काय म्हणायचे. अशावेळी ज्याने नकार दिला आहे त्या व्यक्तीचीच ज्यास्त चूक वाटते. जर आपला निर्णय नको असा असेल तर पुढे जायचेच कशाला! 
     मराठी व भारतीय संस्कृतीनुसार प्रेमाचे रुपांतर लाग्नातच होते. बऱ्याच वेळा  प्रेम असलेल्यांना जातीमुळे लग्नाला विरोध असतो. हा विरोध होणार हे आधीच माहिती असेल, तर आपण नेमके काय करायचे हा निर्णय ठाम असला पाहिजे. म्हणजे आपण कोणालाही न जुमानता लग्न करायचे की, प्रेमाच्या वगैरे फंद्यातच  पडायचे नाही. कमीत कमी हा निर्णय तरी पक्का असावा.
    प्रेम करणे हा कधीच गुन्हा नाही. पण ते करत असताना त्याचा काही विपरीत परिणाम तरी होणार नाही ना,  एका व्यक्तीच्या प्रेमासाठी आपण अनेक व्यक्तींच्या प्रेमाची आहुती तर देत नाहीत ना ते पहा. माझेतर असे मत आहे की प्रेम हे लग्नानंतर सुद्धा करता येते. प्रेम करण्यासाठी समोरच्या व्यक्तीला जाणून घेणे जरुरीचे असते, पण आजच्या काळात तेही शक्य आहे, कारण लग्नाआधी  किंव्हा लग्न जमल्यानंतर  भेटण्याची, बोलण्याची  संधी आजकाल आपले आई, वडील देतातच.  प्रेमाचा अर्थ आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला किती सुखात ठेवतो एवढेच नव्हे तर, त्यासाठी आपण किती त्याग करू शकतो असा ही आहे. मी तर म्हणतो जे प्रेम सर्वांनाच घेऊन पुढे जाईल, सर्वांनाच सुख देईल तेच खरे प्रेम.       
    आणि शेवटी ज्यांना कोणाला प्रेम झाले असेल त्यांचे जीवन आनंदात जाऊदे अशी ईश्वर चरणी प्रार्थना .........!

Friday, November 13, 2009

लग्न





लग्न हा एक जुगार आहे असे म्हणतात. या विषयावर बऱ्याच लोकांचे वेगवेगळे विचार, वेगवेगळे मते आहेत. आपणाला कश्याप्रकाराचा जोडीदार हवा हे प्रत्येकाने स्वत्ताच ठरवायचे असते. शेवटी हा प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रश्न असतो.
पण जेंव्हा ही वेळ येते तेंव्हा असे आढळून आले आहे कि बऱ्याचजणांना नेमका काय निर्णय घ्यावा हेच समाजात नाही. कित्तेक मुले आणि मुली आहेत कि त्यांना लग्न केंव्हा करायचे व आपण पुढील वक्तीकडून काय अपेक्ष्या ठेवल्या पाहिजेत हेच नेमके माहित नसते.
प्रत्येकालाच लग्न करायची हौस तर भारी असते पण बऱ्याच जणांना ते पेलण्याची लायकीच नसते. लग्ना विषयी अनेक लोकांच्या विविध संकल्पना, विविध विचार, विविध अपेक्ष्या असतात. लग्न हे नाव आल्याबरोबर अनेक प्रश्न सुद्धा निर्माण होतात. पहिलाच प्रश्न असतो तो मुलगा किंव्हा मुलगी कशी असावी. सुंदर मुलगी तर प्रत्येक तरुणाला हवी असते मग तो स्वतः कितीही  नकटे किंवा काळा असो. बरे सुंदरता तर ठिक आहे त्याच सोबत हवे असतात गुण. आत्ता प्रश्न आला गुणांचा. आत्ता ते कसे पहायचे? तसे पाहायला गेल्यास आत्ताच्या युगात ती हि मिळणे जास्त काही अवघड नाही.
बरे हे सर्व ठिक आहे. या सर्व गोष्टीनंतर खरा खेळ चालू होतो. तो म्हणजे पत्रिका पाहण्याची. पत्रिका म्हटली कि आली कुंडली, रास,नाड. एक नाड  नसावी, किती गुण जुळतात, तो गण का काय ते पण असतं, त्यात म्हणे राक्षस, देव, मनुष्य, वानर असे प्रकार असतात. राक्षस आणि देव गण, राक्षस आणि मनुष्य गण जमत नसते, का तर त्यांच्यात नेहमी भांडण होतात. तुम्ही खरच मानता का हो हे सगळे? 
तसे पहायाले गेले तर कितेक  पत्रिका ह्या अंदाजेच तयार केलेल्या असतात. माझ्या मते तर समोरचा व्यक्ती कसा आहे  ते पहा, त्याच स्वभाव, शिक्षण, आवडी निवडी काय आहेत ते पाहणे जरुरीचे आहे. तो कोणत्या परिस्तिथीतून पुढे गेला आहे, स्वतःच्या हिमतीवर  पुढे गेला आहे का, किंव्हा स्वतःच्या कर्तुत्वावर उभा आहे ते पहा. तो खरच धाडसी , हिमती आहे का ते पहा. मुलाकडे किती मालमत्ता, किती  जमीनजुमला आहे हे पाहण्याच्या ऐवजी त्याला ती सांभाळायची तर अक्कल आहे का नाही ते पहा. बरेच माणसे मुलाच्या घराची संपत्ती पाहूनच लग्न ठरवतात.
मुलगी पाहताना सुद्धा आपल्याला शोभेल अशीच मुलगी मुल्लांनी पहावी असे मला तरी वाटते. नाहीतर भरपूर पैसा मिळतोय म्हणून कसल्याही मुलीशी लग्न करणारी हि मुले आहेत. माझ्या मते तर पहिली अट तर मुलगी हि शिकलेली असावी. कारण शिक्षण हि एक खूप महत्वाची गरज आहे. जर दोघेही शिकलेले असतील तर कमीत कमी दोघांमध्ये वैचारिक मतभेद कमी होतील असे मला वाटते. मुलगी हि घरच्यांचा वडिलधाऱ्यांचा मान ठेवणारीच असावी. पिझ्झा बर्गर यापेक्षा सुद्धा घराच्या जेवणाला महत्व देणारी असावी. सर्वांशी मिळून मिसळून राहणारी असावी.
या पेक्षाही महत्वाचे म्हणजे दोघांनीही आपली वैद्यकीय चाचणी करून घ्यावी. त्यामुळे मुलामध्ये किंवा मुलीमध्ये काही दोष आहेत का नाहीत ते कळून येईल. काही टाळण्याच्या गोष्टी असतील तर त्या टाळता येतील. सोबतच दोघांनापण लग्ना आगोदर मोकळेपणाने बोलू द्यावे. दोघांनी पण आपापले विचार एकमेकां समोर स्पष्ट बोलावेत. आपणाला भविष्यात काय करायचे आहे  किंवा नाही ते प्रथम स्पष्ट करून घ्यावे व नंतरच लग्न करावे.
ह्या तर झाल्या लग्नाआधी पाहण्याच्या गोष्टी, पण खऱ्या गोष्टी तर लग्नानंतरच असतात. माझा अर्थ फक्त तो नाही  तर, दोघांनी पण एकमेकांशी कसे वागावे, कसे राहावे. कारण लग्नानंतर बत्याच गोष्टी या चुकीची माहिती किंव्हा गैरसमजामुळे होतात. कामाचे हि पाहता ते घराच्या वातावरणावर अवलंबून आहे. जर मुलगी  नौकरी करत नसेल तर थोडे ठीक आहे , कारण त्या वेळी बहुतेक काम मुलगीच करते, पण अश्यावेळी थोडी फार कामे मुलाने केली तर हरकत नाही असे मला वाटते. उलट अश्या वेळी मुलींना खूप छान पण वाटते. तुम्ही काम केले नाही तरी चालेल पण एकदा म्हणून पहा कि "मी काम करतो", बघा ती तुम्हाला काम तर करूच देणार नाही, तर आहे ते काम पण ती मनापासून करेल. आणि बायको जर नौकरी करणारी असेल तर त्यावेळी मात्र तुम्हालाही मदत करणे गरजेचे आहे. आणि मुलींनी पण नौकरी करत असताना सुद्धा आपल्या घराचे घरपण जात नाही ना ते पाहावे. आणि शक्य असेल  तेवढे घरीच वेळ काढावा, घरामध्ये स्वतः बनूनच  जेवण करावे, यामुळे घराचे घरपण कायम राहते.